Posted in छोटी कहानिया - १०,००० से ज्यादा रोचक और प्रेरणात्मक

माह्या गुरजीची गाडी


“ माह्या गुरजीची गाडी ”….

तो एक नवयुवक….
डीएड झालेला…
गुरुजीची नोकरी लागली… पण दूरच्या जिल्ह्यात….
एका पारधी समाजाच्या तांड्यावर….
जिथं शिक्षण आणि शाळा पिढ्यानपिढ्यापासून कशाशी खातात हेच माहित नाही अश्या ठिकाणी…
पण तोही अस्सल गुरुजी…. नव्या पिढीचा….
नव्या विचारांचा…
अर्थात तुमच्या-माझ्या सारखा….
ज्या दिवशी रुजू झाला तो दिवस शाळा नावाच्या वास्तूला समजून घेण्यातच गेला. दिवसभर एकही पोरगं शाळेकडं फिरकलं नाही…. पण त्याने हार मानली नाही. तो रोज पालावर जायचा. पोरांच्या आई-बापांना पोरांना शाळेत पाठवायला सांगायचा. हळूहळू त्या अडाणी लोकांना पटायला लागलं आणि वेगवेगळ्या वयाची कधीही शाळेत न गेलेली ती रानफुलं शाळा नावाच्या तुरुंगात येवून बसू लागली….
रानावनात लीलया फिरणारी ती मुलं शाळेत मात्र अवघडल्यासारखी बसत… पण आपला मित्रही काही कमी नव्हता.

त्याने अशी काही जादू केली कि त्या पोरांना गुरुजी आवडू लागला….
अन् रानात,
काट्याकुट्यात ससा,
तितर सहज पकडणारे हात ग म भ न गिरवायला लागले.
नोकरी मिळाल्यावर आपल्या मित्राने त्याची ड्रीम बाईक घेतली. रोज सकाळी तो स्वतः आंघोळ करण्यापूर्वी गाडीला साफ-सुफ करायचा…
मगच शाळेची तयारी.
नव्या कोऱ्या बाईक वरून शाळेच्या ठिकाणी जावून-येवून करण्य्यात तो रोज थ्रिल अनुभवायचा. ती गाडी त्याची जिवाभावाची मैत्रीणच बनून गेली होती जणू…
एक साधा ओरखडा किंवा थोडीशी धूळही गाडीवर पाहून अस्वस्थ व्हायचा तो….
रोज शाळेच्या समोर एका झाडाखाली गाडी लावून शाळा सुरु व्हायची….

आनंददायी शिक्षण पद्धती वापरल्यामुळं गुरुजीवर मुलांना रागवायची पाळीच कधी येत नव्हती. पोरं रोज गुरुजीची गाडी यायची वाट बघत शाळेजवळ येवून थांबत आणि गाडी गेल्यावरच घरी जात….

पण…..

भर झोपेत मोठा आवाज झाल्यावर दचकून झोप मोडावी अन् सुंदर स्वप्न सहज भंग पावावं तसं झालं त्या दिवशी….
रोजच्याप्रमाणे तो गाडीजवळ गेला आणि त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसेना…

गाडीच्या टाकीवर कुणीतरी टोकदार दगडांनी काहीतरी कोरलं होतं. त्याच्या आवडत्या गाडीच्या टाकीवर ओढलेले ओरखडे पाहून तो प्रचंड संतापला.

पोरं समोरचं उभी होती. कधीही न सुटलेला त्याचा तोल गेला. तो त्या पोरांना अद्वा-तद्वा बोलू लागला. त्याच्यातील सदसद्विवेकबुद्धी पार हरवून गेली.
फक्त राग आणि राग….
पोरं घाबरून गेली. त्यांनी आपल्या गुरुजींना कधीही एवढं रागवलेलं पाहिलं नव्हतं. नेहमी प्रेम करणारा त्यांचा गुरुजी….
पण आज मात्र प्रचंड संतापून त्यांना शिव्या-शाप देत होता आणि एकच विचारात होता….
सांगा कुणी गाडी खराब केली? माझ्या गाडीवर ओरखडे कुणी ओढले?

पण या रागाच्या प्रसंगी कोण पुढं येणार… .
सगळी पोरं भयचकित होऊन एकमेकाच्या तोंडाकडं बघत होती….

इतक्यात एक चिमुरडी पुढं आली आणि होणाऱ्या परिणामांची काळजी न करता म्हणाली,

‘ गुरजी, मी लिव्हलं तुझ्या गाडीवर…’

तो खूप चिडला आणि विचारू लागला का पण….?
शेवटी ती बोलू लागली ‘काल गावातून अशीच एक गाडी चोरीला गेली. मला वाटलं, गुरजीची गाडी कुणी चोरून नेली तर…?
म्हणून मी गाडीवर लिव्हलं…..
इतका वेळ फक्त स्वार्थी अविचारी रागाने त्याच्या मनाचा ताबा घेतला होता…. पण त्या पोरीचे शब्द ऐकले अन् एकदम भानावर आला तो….
तेव्हा कुठं बारकाईनं पाहिलं गाडीकडं त्यानं…
गुरुजींनी शिकवलेल्या बाळबोध अक्षरात त्या चिमुरडीनं गाडीच्या टाकीवर कोरलं होतं….

“माह्या गुरजीची गाडी “

टचकन पाणीच आलं त्याच्या डोळ्यात….
इतका वेळ आरोपी सापडला कि त्याला शिक्षा करायला शिव-शिवणाऱ्या हातात त्याने ते चिमुकले हात घेतले आणि त्यांच्यावर ओठ टेकवले…………
अश्रूंना वाट मोकळी करून देण्याशिवाय पर्याय नव्हता त्याच्यापुढे…..
मुलं बिचारी गोंधळून गेली… गुरुजी अचानक का रडतायेत…
हेच कळंत नव्हतं त्यांना….. पण गुरुजींना मात्र सर्वकाही कळलं होतं….
शब्दांच्या पलिकडलं….

त्यानंतर गुरुजींनी गाडीवरचे ओरखडे तसेच ठेवले… आजही आपला तो मित्र मोठ्या दिमाखात तीच गाडी वापरतोय…
अन् तशीच वापरतोय..
तो जेव्हा गाडीवर बसतो…. त्याची छाती गर्वाने फुगलेली असते….

कुणी विचारलंच तर तो अभिमानाने सांगतो कि,
हा मला मिळालेला राष्ट्रपती पुरस्कारापेक्षाही मोठा पुरस्कार आहे…..
( संकलित )

ग्रामीण भागात प्रतिकुल परिस्थितीत काम करणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक बंधू बहिणींना सदर पोस्ट समर्पित…

Author:

Buy, sell, exchange old books

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s