Posted in स्वाध्याय

पांडुरंग शास्त्रीं आठवलेंचा एक विचार
यत्र योगेश्वरो कृष्णो…
स्वाध्याय परिवार… मॅगसेसे, टेम्पल्टन, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पद्मविभूषण पुरस्कार. असंख्य कार्यकर्त्यांचं पाठबळ.
पांडुरंग शास्त्री आठवले ह्यांच्याबद्दल लिहावं तितकं कमीच आहे !!
त्यांच्या नंतर आजही असंख्य राबते हात देशभर काम करत आहेत.
त्यांचे विचार हा संपूर्ण भारतवर्षाला जोडणारा एक धागा आहे.
पांडुरंग शास्त्री ह्यांच्या विचारात काय बळ आहे? त्यांचे विचार कोणती किमया करू शकतात ?
विनय नावाच्या एका तरुणाचा हा किस्सा आहे. तो मला पहिल्यांदा भेटला तेव्हा गप्पा मारता मारता म्हणाला,
” दादा, मी बोटीवर पोर्टर म्हणून काम करतो. बोट जगभर फिरते. त्यामुळे अनेक महिन्यांनी घरी येतो.
पगार चांगला आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे. मी पर्मनंट नाही. त्यामुळे बोटीवर जावं की नाही हा प्रश्न पडतो. जॉब सोडला तरी मुंबईत दुसरा जॉब मिळणार नाही. त्यामुळे काय करावं हा प्रश्न पडला आहे. ”
विनयच्या घरी आई -वडील आणि एक बहीण होती. वडिलांची कंपनी बंद पडल्याने अनेक वर्षे गरिबीत काढावी लागली होती. पण आता विनय चांगली कमाई करत होता. बहिणीचं लग्न लावून देणार होता. पण नोकरीचा भरवसा नव्हता. बोटीवर बोलावलं नाही तर घरीच बसावं लागणार होतं.
त्याने मला हताश होऊन विचारलं
” तुम्हीच सांगा, मी काय करू?”
ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेही नव्हतं. फक्त एक उदाहरण मला आठवलं.
” विनय, तू जेवायला बसतोस तेव्हा चार पोळ्या खातोस.
पहिली पोळी खाल्ली तरी भूक भागत नाही. दुसरी खाल्ली तरी पोट भरत नाही.
तिसरी पोळी खाल्यावर थोडी भूक कमी होते आणि चौथ्या पोळीने पोट भरतं.
पण तू आईला असं म्हणू शकतोस का की मला चौथी पोळी आधीच दे.
माझं लगेच पोट भरेल आणि आधीच्या तीन पोळ्या खाण्याचे कष्ट करावे लागणार नाहीत ”
विनय सहजपणे म्हणाला,
” असं कसं होईल. आधीच्या तीन पोळ्या खाव्याचं लागणार!”
मी तोच धागा पकडून पुढे म्हणालो,
” यशही असंच असतं. कष्ट करत, टक्के टोणपे खात, एक एक पायरी चढून जावं लागतं आणि मग यश मिळतं. एकदम यशाकडे जाण्याचा मार्ग नाही. ”
विनय त्यावर काही बोलला नाही. तो बोटीवर गेला आणि पुढे दोन वर्षे काहीच संपर्क झाला नाही.
विनय नोकरी करत असेल का ? की कंपनीने त्याला काढून टाकलं असेल ?
निराश विनयचं पुढे काय झालं ह्याची उत्सुकता मला लागली होती.
आणि एक दिवस विनय अचानक माझा पत्ता शोधत आला. कंपनीने त्याला पर्मनंट केलं होतं आणि विनयने तोवर भाड्याचं घर सोडून नवीन ब्लॉक घेतला होता. आता भविष्याची त्याला चिंता नव्हती.
विनय आनंदाने म्हणाला,
” दादा, तुम्ही पोळीचं उदाहरण दिलं. ते मी लक्षात ठेवलं. मन लावून काम केलं आणि माझे कष्ट पाहून कंपनीने मला पर्मनंटचं लेटर दिलं. ”
विनयला शेवटी भेटलो तेव्हा तो उदास होता आणि आता चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता… हा आनंद मिळाला होता कष्टाने !
विनय म्हणाला,
” आता तुम्हाला पार्टी द्यायची आहे. बोला कुठे पार्टी देऊ !”
मी विनयला लगेच सांगून टाकलं
“मी जे उदाहरण तुला दिलं होतं ते माझं नव्हतं. पांडुरंग शास्त्री आठवले ह्यांनी दिलेलं ते उदाहरण आहे!
पार्टी द्यायचीच तर वेगळी पार्टी दे. हे उदाहरण तू इतरांना सांग. अडीअडचणीत असणाऱ्यांना सांग.
त्यांनाही ते उपयोगी पडेल.”
त्यावर विनयने ठामपणे होकार दिला.
आता विनयने बहिणीचं लग्न लावलं. स्वतः लग्न केलं आणि तो स्थिर झाला आहे. बोट जाईल तिथे, जगभर फिरतो.
आठवलेंच्या एका विचाराची ही किमया आहे. एका विनयला त्यांनी सकारात्मक -positive विचार दिला.
तुम्ही हे वाचाल तेव्हा एकचं अपेक्षा आहे. ह्या उदाहरणाचा प्रसार करा. त्यात अशी शक्ती आहे की संघर्ष -struggle करणाऱ्याला बळ मिळेल. कष्टाचं मोल कळेल.
आठवलेंचं हे उदाहरण, त्यांचे अनेक विचार हे धन जितकं लुटता येईल तितकं लुटायचं आहे.
कारण जितकं लुटलं जाईल तितकं धन वाढत जाणार आहे.
यत्र योगेश्वरो कृष्णो, यत्र पार्थो धनुर्धर:।
तत्र श्रीर्विजयो, भूतिर्धुवा नीतिर्मतर्मम्।
जिथे श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे. जिथे आठवलेंचे विचार आहेत तिथे यश निश्चित आहे.
लेखक : निरेन आपटे.

Author:

Buy, sell, exchange old books

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s