Posted in संस्कृत साहित्य

जीवेत शरद: शतम्‌ – डॉ. श्री बालाजी तांबे


 

जीवेत शरद: शतम्‌
– डॉ. श्री बालाजी तांबे

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=DFQ7E

 

दीर्घायुष्यासाठी आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही. आयुर्वेदातील स्वस्थवृत्त, पंचकर्माद्वारा कायाकल्प, रसायनसेवन, वयःस्थापन वगैरे अनेक संकल्पना दीर्घायुष्याच्या उद्देशाने सांगितलेल्या आहेत.

वेदवाङ्‌मय असो, प्राचीन भारतीय शास्त्रे असोत किंवा आयुर्वेद असो, दीर्घायुष्याची इच्छा प्रत्येक ठिकाणी केलेली आढळते. “दीर्घायुषी भव‘ हे आशीर्वचनही आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असेल.

आयुर्वेद स्वर्गातून पृथ्वीवर आला, तोच मुळी दीर्घायुष्याच्या कामनेमुळे. म्हणूनच चरकसंहिता या आयुर्वेदाच्या मुख्य ग्रंथामधल्या पहिल्या अध्यायाचे नाव आहे, “दीर्घज्जीवितीयम्‌‘।

ऋषयश्‍च भरद्वाजात्‌ जगृहुस्तं प्रजाहितम्‌।
दीर्घमायुश्‍चकिर्षतो वेदं वर्धनमायुषः।।
चरक सूत्रस्थान 

आयुष्य वाढविणारे व समस्त प्राणिमात्रांचे हित करणारे असे जे आयुर्वेदशास्त्र, ते दीर्घायुष्याची इच्छा करणाऱ्या ऋषींनी भारद्वाजाकडून स्वीकारले (व ग्रंथाच्या रूपाने सर्वांपर्यंत पोचवले) यावरून “दीर्घायुष्य‘ संकल्पना ही आयुर्वेदशास्त्राचे मूळ आहे हे लक्षात येते. दीर्घायुष्य म्हणजे नेमके काय, हेही आपल्या शास्त्रात सांगितले आहे,

पश्‍येम शरदं शतं, जीवेम शरदं शतं, श्रृणुयाम शरदं शतं, प्रब्रवाम शरदं शतं, अदीनाः स्याम शरदं शतं भूयश्‍च शरदः शतात्‌ । … यजुर्वेद 

100 वर्षांपर्यंत आम्ही (सूर्याचे) दर्शन करोत, 100 वर्षांपर्यंत आम्ही जिवंत राहोत, 100 वर्षांपर्यंत आम्ही (शब्द) ऐकते राहोत, 100 वर्षांपर्यंत आम्ही भाषण करोत, 100 वर्षांपर्यंत आम्ही अ-दीन (कोणत्याही प्रकारच्या परस्वाधीनतेशिवाय) राहोत, इतकेच कशाला; 100 वर्षांची मर्यादाही आम्ही ओलांडून पुढे जावोत.

100 वर्षे या प्रमाणे आरोग्यपूर्ण अवस्थेत जगण्याची फक्‍त इच्छा असणे पुरेसे नाही, तर त्यासाठी प्रत्येक स्त्री-पुरुषाने सुरवातीपासून प्रयत्न करायला हवेत. म्हणूनच वेदांमध्ये सांगितले आहे,

कुर्वन्‌ नेवेह कर्माणि जिजिविषेत्‌ शतं समाः।
एवं त्वयि नान्यथेतो।स्ति न कर्म लिप्यते नरे।। ….यजुर्वेद 

पुरुषाने (स्त्री-पुरुषाने) त्याच्या प्रकृतीला अनुरूप असा जो वर्ण व आश्रम असेल, त्यानुसार शास्त्रसंमत कर्म करता करता 100 वर्षे जगण्याची इच्छा ठेवावी, यापेक्षा वेगळी इच्छा करू नये. कारण, त्यामुळेच त्याला त्याच्या कर्माचे बंधन होत नाही.

थोडक्‍यात, जन्माला आलेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाला स्वतःचे कर्तव्य आदर्शपद्धतीने पूर्ण करायचे असेल, तर तिला किंवा त्याला दीर्घायुष्याची इच्छा ठेवणे व त्यासाठी प्रयत्न करणे अपरिहार्य आहे.

दीर्घायुष्याची पहिली पायरी म्हणजे आरोग्य. आरोग्य नसेल तर रोजचे काम करण्यातही ज्या अर्थी बाधा येते, त्या अर्थी रोग हा दीर्घायुष्यातील मोठा अडथळा होय. मात्र, केवळ रोग नाही म्हणजे आरोग्य आहे असे समजणे पुरेसे ठरत नाही. आयुर्वेदात आरोग्याची नेमकी लक्षणे पुढीलप्रमाणे सांगितली आहेत,

सृष्टविण्मूत्रवातत्वं, शरीरस्य लाघवं, सुप्रसन्नेन्द्रियत्वं, सुखस्वप्नं, प्रबोधने, बलवर्णायुषां लाभः, सौमनस्यं, समाग्निता चेति। …काश्‍यपसंहिता

अर्थात, वेळच्या वेळी भूक लागणे, खाल्लेले अन्न सहज पचणे, मल-मूत्र प्रवृत्ती सहज व वेळच्या वेळी होणे, शरिरास हलकेपणा जाणवणे, सर्व इंद्रिये आपापले कार्य कुशलतेने करत असणे, सहज झोप येणे व तितक्‍याच सहजतेने जाग येणे, जाग आल्यावर ताजेतवाने वाटणे, उत्तम बल, कांतियुक्त वर्ण व दीर्घायुष्याचा लाभ होणे, मन आनंदी असणे व जठराग्नी सम-संतुलित स्थितीत असणे ही लक्षणे उत्तम आरोग्याची निदर्शक आहेत.

अशा आरोग्यासाठी, पर्यायाने दीर्घायुष्यासाठी आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही. आयुर्वेदातील स्वस्थवृत्त, पंचकर्माद्वारा कायाकल्प, रसायनसेवन, वयःस्थापन वगैरे अनेक संकल्पना दीर्घायुष्याच्या उद्देशाने सांगितलेल्या आहेत. शास्त्रोक्‍त पद्धतीने यांचा जीवनात अंतर्भाव करून घेतला तर जीवन सुखाने व्यतीत होऊ शकते. यातील काही महत्त्वाच्या, प्रत्येकाला स्वतः करता येण्याजोग्या गोष्टी थोडक्‍यात पुढीलप्रमाणे सांगता येतील.

1. लवकर निजे, लवकर उठे, त्यासी ऋद्धी-सिद्धी भेटे
2. नियमित व्यायाम, योग, आसने, प्राणायाम
3. वात-पित्त-कफ प्रकृतीनुसार आहार
4. आहार षड्रसयुक्‍त (मधुर, आंबट, खारट, कडू व तुरट) व चतुर्विध (भोज्य, भक्ष्य, पेय व लेह्य) असा चार प्रकारचा
5. नेहमी पोट साफ राहण्यासाठी अधूनमधून सौम्य विरेचन व कृमिनाशक उपचार
6. पिण्यासाठी उकळलेले व शक्‍यतो सुवर्णसिद्ध जल
7. नियमित अभ्यंग (मसाज)
8. डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा या पंचेंद्रियांचे आरोग्य
9. व्यवसाय प्रकृतीनुरूप ताणतणावरहित
10. घरात नियमितपणे धूप जाळणे
11. आवश्‍यकतेनुसार पंचकर्म करून शरीरशुद्धी
12. नियमित “रसायन‘सेवन
13. अति वीर्यनाश होणार नाही याची काळजी व विवाहितांनी वेळ-काळ पाहून प्रकृतीला मानवेल एवढे मैथुन (आयुर्वेदिक ब्रह्मचर्य).
14. स्त्रीने पाळीच्या चार दिवसात विश्रांती; अंगावर पांढरे-लाल जात असल्यास लगेच योग्य उपचार
15. सुदृढ, बुद्धिमान अपत्य जन्माला यावे म्हणून दांपत्याने गर्भधारणेपूर्वी स्वतःची तब्येत उत्तम करून घेणे.
16. रोग झाल्यास तो फक्‍त नियंत्रित ठेवण्यासाठी नाही तर समूळ बरा करण्यासाठी प्रयत्न
17. रोगावर उपचार करत असताना तसेच रोग बरा झाल्यावरही रोग होण्याच्या कारणापासून दूर राहणे.
18. रोज थोडा वेळ स्वास्थ्यसंगीत, ध्यान, ॐकार गूंजन
19. कर्तव्य कर्म करताना भविष्यात फायदा होईल यावर अवलंबून राहण्यापेक्षा कार्य करतानाच आनंद घ्यावा.
20. सर्वांभूती प्रेम व सेवाभाव
21. सामाजिक व नैसर्गिक नीतिनियमांप्रमाणे आचरण.

या सर्व झाल्या आवर्जून कराव्यात अशा गोष्टी. याशिवाय, कोणकोणत्या गोष्टी करणे चांगले नाही, याचाही माहिती करून घ्यायला हवी. 
1. सकाळी उशिरा न उठणे (पहाटे वातकाळ संपण्यापूर्वी उठल्यास वातामुळे होणाऱ्या मलविसर्जनादी क्रिया सहज होऊ शकतात)
2. भूक लागली नसता जबरदस्तीने न जेवणे
3. दूध व फळे यांसारख्या विरुद्धान्नाचे सेवन न करणे
4. रात्री/सूर्यास्तानंतर दही, फळे न खाणे.
5. भेसळ किंवा विषारी औषधांचा वापर केलेले अन्नपदार्थ किंवा रासायनिक द्रव्यांपासून तयार केलेल्या उत्पादनांचा वापर न करणे.
6. शारीरिक वेग उदा. मल, मूत्र, भूक वगैरेंना न अडवणे.
7. नेहमी पोट साफ होते आहे किंवा नाही, याकडे दुर्लक्ष न करणे
8. व्यसनाधीन न होणे
9. ताकदीपेक्षा अधिक व्यायाम न करणे
10. पावसाळ्यात अतिश्रम न करणे.
12. अतिसाहस न करणे. मनुष्याचा वावर नाही अशा ठिकाणी जाणे, ज्याच्याविषयी माहिती नाही, असे कृत्य करणे, स्वतःच्या कुवतीपेक्षा अधिक परिश्रम करणे वगैरे गोष्टी “अतिसाहस‘ या संज्ञेत मोडतात.
13. प्रकृती समजून न घेता अति जाड वा अति बारीक होण्याचा प्रयत्न न करणे. वातप्रकृतीच्या व्यक्‍तीने बॉडी बिल्डर होण्याचा प्रयत्न करणे, कफप्रकृतीच्या व्यक्‍तीने अगदी सडपातळ होण्याचा प्रयत्न करणे
14. स्त्रीरोगांकडे दुर्लक्ष न करणे
15. अति किंवा अनैसर्गिक मैथुन न करणे
15. समान गोत्रातील स्त्री-पुरुषात गर्भधारणा व गर्भधारणा असताना डोहाळे पूर्ण न होणे किंवा चुकीचा आहार – विहार न करणे
16. रोगाकडे किंवा अस्वास्थ्याकडे दुर्लक्ष न करणे.
17. इच्छा पूर्ण करण्यासाठी इंद्रियांना अति प्रमाणात न दमवणे. सतत हेडफोन्स वापरणे, मोबाईल वा फोनवर सातत्याने बोलणे, डोळे थकले तरी टीव्ही, संगणकासमोर बसणे वगैरे टाळणे.
18. चुकीची व वाईट संगत न धरणे
19. सतत चिंता किंवा रागा-राग न करणे
20. सर्व गोष्टीत संशय व अश्रद्धा न ठेवणे
21. आई-वडील, गुरुजन, ज्ञानी यांचा आदर न करणे

थोडक्‍यात दीर्घायुष्य, तेही निरोगी दीर्घायुष्य हा जन्माला आलेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाचा अधिकार आहे, तो मिळविण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने तत्पर राहणे आवश्‍यक आहे आणि यासाठी आयुर्वेदशास्त्राचा रोजच्या जीवनात अंतर्भाव होणे गरजेचे आहे.

 

Author:

Buy, sell, exchange old books

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s